Posts

2026

नव्या वहीची कोरी पाने पुन्हा नवी सुरुवात आहे पानावर जे लिहिले जाईल कुतूहल त्याचे मनात आहे - जुई ( १-१-२०२६) काळाने पानावर लिहिली ती स्मरणीय भेट  डोळ्यातून संवाद मनाचा झाला होता थेट - जुई  रंग फुलाचा पानाचा रंग प्रेमाच्या नात्याचा  रंग निखळ मैत्रीचा रंग कवीच्या मनाचा  - जुई  आंब्यांच्या बनात हिरवी शाल पेरूचं झाड अन जोडीला माड केळीच्या पानात हिरव्या रानात केळीचे फुलं पुरवते लाड - जुई  हाक आपुलकीची येते   अमूल्य असतो तो एक क्षण   कवितेसोबत लिहिणाऱ्या   हाताचे सुद्धा सुखावते मन  - जुई 

कवितेची फुले

मागुनी घेतली हासरी  सावली  दाखवे गोजिरी टाळते जायची वाट मी का मला सांग रे साजिरी  *** रानफुले रानात  माझ्या मनात फुलली  सानुल्या कळ्या वेलीवर  सकाळ सजली  *** बळीराजा पाहतो वाट धान्य सोन्याच्या मोलाचं पिकवले मातीतून परी रित राहिलं ताट त्याच *** भुईवर फुलवाया  मारा काळजात केला ठिगळं मातीची फोडून हाती पाऊस ना आला - जुईली अतितकर

2025

नववर्षाच्या वाटेवरती  स्वप्न साजिरे सजताना  नव्या प्रवासा निघतो आपण  मागे ठेवून पाऊल खुणा - जुई ✍🏻 ✨(2025)✨ एक खिडकीचा आडोसा घेतला स्वप्नाचा कानोसा टपोऱ्या डोळ्यात तिच्या दाटला मायेचा  कवडसा - ©®जुई विजलेल्या या आकाशी अंधार देतसे ग्वाही त्याच्या ही वाटेवरती बघ फुलले आहे काही  - जुई   घर, कौलारू स्वप्नांचे हिरव्या सावलीत लपलेले  ढग, डोंगर, सूर्य नी पक्षी चित्रा मध्ये दिसलेले  - जुई  नवी पाऊले टाकत आले असे एक नवे काही   बाळाच्या येण्याने आईचे घर सारे आनंदून जाई - जुई  एवढ्या दूर आले पण गाठीला बालपणीचा ठेवा  तिथली एक गोड आठवण नेते परीकथेतील गावा  - जुई  अबोल आपल्या नात्यात बोलके डोळे पुरेसे तुझी सोबत असताना पायवाट ही सुंदर भासे - जुई🌿

दिवाळी

उंबऱ्यात सजलेली एक दिव्यांची दिवाळी फुलू लागली दारात  रंग रंगीत रांगोळी सुचू लागल्या पानास  आज कवितेच्या ओळी... तुझ्या माझ्या कवितेत एक आपली दिवाळी - जुई

सप्टेंबर 2024

हरवलेली पायवाट, हरवलेली जागा सापडणार कुठे हरवलेली आशा ***** साठले मनातले वाचले कितीक मी आटले कितीक आणि गाठले कितीक मी ***** वाट माझी वळणाची हिरव्या पानात वाट माझी सजलेली हिरव्या रानात  ******

मनातलं काही

कोसळणाऱ्या झऱ्याखाली दगडाचा आधार घेऊन उमलून आलेलं रंगीत रानफुल म्हणजे जगण्याची इच्छा  - जुई 🌼 वाहणाऱ्या प्रवाहात जसं नितळ निळसर आकाशाचं प्रतिबिंब पडावं तसंच काही मन असावं तिचं. - जुई 💙 भवताली फुललेला लालसर गुलमोहर, दूरवर त्याचे झालेले आच्छादन तेव्हा इतके ही भडक वाटत नाही. पण हळूहळू त्याची लाली आपल्यात उतरत जाते. - जुई ❣️ उन्हाच्या झळा वाढत असताना अचानक पाऊस पडल्यावर आकाशातल्या सात रंगांची वाट पाहणारे डोळे आज खिडकीत दिसले ... तशीच वाट वाट पाहत होते माझी ... तिच्या आयुष्यात आलेला पाऊस होतो मी कदाचित...  🌿जुई🌼 कोसळणाऱ्या पावसाला शांत करणारी माती आपल्यात त्याला सामावून घेताना जशी भिजली होती, तशीच ती दिसली डोळ्यात पाऊस घेऊन त्याला पाहताना.. - 🍂जुई🍃. माझ्याकडे असलेले एक आवडते पान बोलवणारे मधुर शब्द हक्काचे ठिकाण वाढदिवसाच्या निमित्ताने सप्रेम भेट तुला स्वप्नांच्या वाटेवर यश भेटावे गौरेशला  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गौरेश ❣️
झाडांची असते दाटी सडा सोन चाफ्याचा हिरवी पहाट होते रोज झोपडीत माझ्या - जुई दूर एक ठिपका दिसलेला तेव्हा लाल पाहत होता निळ्या सागरा नारंगी त्याचे गाल.... मावळत्या झाल्या त्याच्या तेव्हा गोल कडा पसरली कमान  आणि झाला केशरी भवताल... - जुई विसावल्या किरणांना वेड प्रकाशाचे निस्तेज पाण्यावर ही तरंग उठले त्यांचे  - जुई रंग वेगळे घेत मातीत दूर दूर तो बहरत आहे पाऊस हिरवा अंतरीचा कड्याकपारी उतरत आहे. - जुई तिच्या आवडी, तिची काळजी, तिचे बोलणे आठवते ती नसल्यावर हसणे, रुसणे, सोबत असणे आठवते - जुई तुझे माझ्यात असणे  माझे तुझ्यात असणे कधी तुला शोधताना मला माझे  गवसणे - जुई इतके नाजूक इतके साधे असते काही दूर तिथे त्या वेलीवरती फुलते काही  - जुई सुकले सुकले म्हणता म्हणता फुलू लागले रंग फुलाचे सभोवताली  कळू लागले - जुई कुणी कुणाला कळले होते कुणी अचानक वळले होते कुठे कुणाला पत्ता होता काट्यात फुल बहरले होते.  - जुई जिथे जिथे पाहत होते, तिथे तिथे दिसला होता ज्या ठिकाणी मी होते, त्याच ठिकाणी तो होता - जुई या गर्द सावलीमध्ये वारा वाजवतो पावा उनाड दिवसांमध्ये क्षणभर तोच विसावा...